ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २३ - चीनमधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या वांग जिआनलिन यांनी भारतामध्ये औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. हे सत्यात उतरल्यास हा भारतातल्या सर्वात मोठ्या विकासप्रकल्पापैकी एक असेल.
जिआनलिन यांच्या वांडा समूहाने हरयाणा सरकारशी करार केला असून औद्योगिक वसाहत उभारण्याची तयारी दर्शवली आहे. वांडा इंडस्ट्रियल न्यू सिटी असं या इंडस्ट्रियल पार्कचं नाव असेल आणि याच वर्षी कामाला सुरुवात होणार आहे. जवळपास १३ चौरस किलोमीटर विस्तारात ही वसाहत उभी राहणार असून सॉफ्टवेअर, वाहनोद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमधल्या कंपन्या या वसाहतीत असतिल. जर, हा प्रकल्प सांगतिल्याप्रमाणे यशस्वी झाला तर ते नरेंद्र मोदींचं विदेशी गुंतवणूक भारतात आणण्याच्या दिशेने असलेले यशस्वी पाऊल ठरेल.
गुंतवणुकीचा विचार केला तर भारतातील ही सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ठरेल असे मत कुशमन वेकफिल्डचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त यांनी व्यक्त केले आहे.
वांडा कराराच्या पूर्ततेसाठी वांग जिआनलिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यामध्ये जून २०१५पासून बोलणी सुरू होती. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून वांडा कल्चरल टुरिझम सिटी आणि रेसिडेंट डिस्ट्रिक्टही विकसित करण्यात येणार आहे.