-ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.१२ - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी 'बुरहान वणी' मारला गेल्यामुळे एकीकडे काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच त्याच काश्मीरमध्ये 'वनी' या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा 'वनी' म्हणजे काश्मीरचा सुपूत्र बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेतील टॉपर नबील अहमद वनी होय.. २६ वर्षीय नबील अहमद वनी देशाच्या रक्षणासाठी लवकरच सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रुजू होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतीच वनी यांची भेट घेतली. बीएसएफच्या प्रमुखांनीच वनी आणि सिंग यांची भेट घालून दिली. उधमपूरच्या या तरूणाचं कौतूक करताना राजनाथ यांनी 'तुम्ही' राज्यातील तरूणांचे आदर्श असल्याचं म्हटलं आहे.
नबील अहमद सीमा सुरक्षा दलामध्ये सहायक कमांडंट म्हणून रूजू होणार असून त्यांच्या या यशामुळे त्यांची आई हनीफा बेगम देखील आनंदी आहे. मुलाची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच ' माझा मुलगा पूर्ण इमानदारी आणि मेहनतीने काम करून देशात शांतता कायम राखण्यासाठी कायम प्रयत्नशील असेल' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नबीलने मिळवलेलं यश म्हणजे काश्मिरमधील तरूण किती प्रभावशाली आहेत हेच दाखवतं, ते कश्मीरी तरूणांसाठी प्रेरणादायी आहेत असं राजनाथ सिंग म्हणाले. जम्मू-काश्मिरच्या सुरक्षेसंबंधी झालेल्या बैठकीतही वणी यांची उपस्थिती होती. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, आयबीचे प्रमुख दिनेश्वर शर्मा, गृह सचिव राजीव महर्षि आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वनी म्हणाले, बेरोजगारी ही तरूणांपुढील सर्वात मोठी समस्या आहे आणि शिक्षण हा एकमेव त्यावरील उपाय आहे. वनी यांनी पठाणकोटमधून इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे. हातात दगड घेऊन शिक्षण घेता येत नाही मात्र हातात लेखणी घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. वनी यांचे वडील शिक्षक होते त्यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
काश्मीरमधील बुरहान वनी या दहशतवाद्यामुळे एकीकडे खोरं पेटलेलं असताना त्याच खो-यातील एक तरूण देशाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे.