कृष्णानगर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचारासह अत्याचार, वंशवाद आणि विश्वासघाताचा घणाघाती आरोप केला; तसेच भाजपाला राज्यातील सर्व ४२ लोकसभा जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य दिले.
नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे सभेत मोदी म्हणाले की, प. बंगालमधील लोकांनी वारंवार तृणमूल काँग्रेसला जनादेश दिला. तथापि, हा पक्ष अत्याचार व वंशवादाचे राजकारण करून विश्वासघाताचा पर्यायवाचक बनला. राज्याच्या विकासाला नव्हे, तर घराणेशाहीला प्राधान्य दिले. तृणमूल काँग्रेसच्या ‘टीएमसी’ या आद्याक्षरांचा अर्थ आता ‘तू, मी आणि करप्शन (भ्रष्टाचार)’ असा झाला आहे. प्रत्येक योजनेला घोटाळ्यात रूपांतरित करण्याचे कौशल्य तृणमूलने प्राप्त केले आहे.
१५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन -याप्रसंगी मोदी यांनी १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. पुरुलिया जिल्ह्यातील दामोदर व्हॅली महामंडळाच्या रघुनाथपूर औष्णिक वीज प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. मेजिया औष्णिक प्रकल्पातील ६५० कोटी रुपयांच्या फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन केले. १,९८६ कोटी खर्चून फरक्का-रायगंज या दरम्यान बांधण्यात आलेल्या १०० किमीच्या चारपदरी मार्गाचे उद्घाटन त्यांनी केले.