नवी दिल्ली : संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरूच्या मुलाने केंद्र सरकारकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा, अशी मागणी केली आहे. गालिब गुरु असे अफजल गुरुच्या मुलाचे नाव आहे. गालिब गुरु याला परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. यासाठी, पासपोर्ट मिळाला तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे गालिब गुरु याने म्हटले आहे.
'माझ्याजवळ आधार कार्ड आहे. याचा मला आनंद आहे. मला तुर्कीमधून स्कॉलरशिप मिळत आहे. यासाठी मला पासपोर्ट पाहिजेत. पासपोर्टमुळे मला परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत होणार आहे', असे गालिब गुरु याने सांगितले आहे.
गेल्यावर्षी बारावीच्या परिक्षेत गालिब गुरु याला 88 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी त्याने कार्डियोलॉजिस्ट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'ज्यावेळी तिहार जेलमध्ये वडिलांना (अफजल गुरू) भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मला डॉक्टर होण्यास सांगितले होते. त्यामुळे मला त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे', असे गालिब गुरु त्यावेळी म्हणाला होता.
दरम्यान, 2001मध्ये पाच दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात घुसून हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार अफजल गुरुला अटक केली होती. तसेच, याप्रकरणी त्याला तिहार कारागृहात फाशी देण्यात आली.