नवी दिल्ली :
‘जेव्हा योग्य मुलगी सापडेल, तेव्हा लग्न करणार. आपल्या आई-वडिलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत,’ असे दिलखुलास मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
‘कर्ली टेल्स’ या युट्यूबवरील खाद्य आणि भ्रमंती प्लॅटफॉर्मशी केलेल्या हलक्या-फुलक्या संभाषणात, राहुल गांधी यांनी त्याच्या बालपणीच्या आठवणींपासून ते आवडते पदार्थ आणि व्यायामाबद्दलच्या प्रेमापर्यंत अनेक गैर-राजकारण विषयांवर चर्चा केली. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, त्यांना लग्न करण्यात कोणतीही अडचण नाही, परंतु वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते व त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यामुळे माझ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. जोडीदार म्हणून एक प्रेमळ मुलगी हवी आहे, जी समजूतदार असावी, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान झाल्यावर काय करणार?पंतप्रधान झालो तर शिक्षण व्यवस्था बदलणार, लघू व मध्यम उद्योगांना मदत करणार, शेतकरी व बेरोजगार तरुणांसारख्या कठीण काळातून जात असलेल्या लोकांना मदत करणार, असा तीन कलमी कार्यक्रम त्यांनी सांगितला.
राजकीय अजेंड्यासाठी भाजपकडून वापर स्थलांतरित काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सांबा जिल्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान भेट घेतली. भाजप आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी समुदायाचा वापर करीत आहे. त्यांना काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, धर्माच्या आधारावर द्वेष पसरविणे हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे, असा आरोप त्यांनी केला.