Waqf Amendment Bill : केंद्र सरकारने बुधवारी(2 एप्रिल 2025) वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संसदेत मांडले. यानंतर आत लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनीही या चर्चेत भाग घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी, आतापर्यंत तुम्हाला पक्षाध्यक्ष का निवडता आला नाही? असा सवाल अखिलेश यांनी केला.
अखिलेश यांच्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले की, अखिलेशजींनी हसतमुखाने प्रश्न विचारला असल्याने मलाही हसत हसत उत्तर द्यायचे आहे. येथे बसलेल्या सर्व पक्षांमध्ये कुटुंबातील पाच व्यक्तीच अध्यक्ष निवडतात. पण आमच्या पक्षात लाखो-करोडो लोकांमधून निवडून आलेला व्यक्ती अध्यक्ष बनतो. अखिलेशजी तुम्ही पुढचे 25 वर्षे अध्यक्ष राहणार..., अशी मिश्किल टिप्पणी शाहांनी यावेळी केली. यावर अखिलेश यांनीही हसत हसत गृहमंत्री शाहांच्या उत्तराला प्रतिसाद दिला.
वक्फ विधेयकाचा विरोध करू...वक्फ विधेयकावर चर्चा करताना अखिलेश यादव म्हणाले, मोठ्या लोकसंख्येसाठी आणखी एक विधेयक आणले आहे. हे वक्फ विधेयक म्हणजे अपयशाचा पडदा आहे. अचानक मध्यरात्री चलनी नोटा काढून टाकल्या. त्या नोटाबंदीच्या अपयशाची चर्चा झाली तरी अजून किती पैसा बाहेर पडतोय कुणास ठाऊक. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट न करणे हे त्याचे अपयश आहे, अशी टीका अखिलेश यांनी केला. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की, हे वक्फ विधेयक कोणत्याही आशेने आणले जात नाहीये; ते एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग आहे. त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळेच आता त्यांना मुस्लिमांमध्ये फूट पाडायची आहे. मी, माझा पक्ष आणि मित्रपक्ष या विधेयकाचा तीव्र विरोध करतो. जर मतदान झाले तर आम्ही त्याविरुद्ध मतदान करू, अशी स्पष्टोक्ती अखिलेश यांनी दिली.