केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले. हे विधेयक मांडतांना त्यांनी काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले. वक्फ तोच व्यक्ती बनवू शकेल, जो पाच वर्षांपासून मुस्लीम धर्मांचे आचरण करत आहे, असे सांगताना वक्फ बोर्डामध्ये कोण कोण असेल, याची माहितीही रिजिजू यांनी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किरेन रिजिजू यांनी सांगितले की, वक्फ परिषदेमध्ये चार सदस्य मुस्लीम धर्माबाहेरील असतील. यात दोन महिलांचाही समावेश केला जाईल.
वक्फ बोर्ड परिषद कशी असणार?
'केंद्रीय वक्फ परिषदेमध्ये २२ सदस्य असतील. त्यापैकी १० सदस्य हे मुस्लीम धर्मातील असतील. जास्तीत जास्त ४ सदस्य हे मुस्लीम धर्माबाहेरील असतील. तीन खासदार असतील. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील २ सेवानिवृत्त न्यायमूर्ती असतील आणि एक वकील असेल', असे रिजिजू यांनी लोकसभेत बोलताना सांगितले.
वाचा >>"वक्फ बोर्डानं तर...!"; मोदी सरकारनं का आणलं विधेयक? किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितलं
रेल्वे आणि लष्करानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन
किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले की, 'भारतात सर्वाधिक जमीन भारतीय रेल्वेकडे आहे. त्यानंतर लष्कराचा क्रमांक येतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्ड आहे. मी त्याला सुधारू इच्छितो. रेल्वेने हजारो किमी रेल्वे रुळ टाकले आहेत. ती रेल्वेची संपत्ती नाहीये, देशाची आहे. लष्कर देशाची सुरक्षा करते, ती सुद्धा देशाची संपत्ती आहे. वक्फ बोर्डाची मालमत्ता खासगी असते. जगात सर्वात जास्त वक्फची मालमत्ता भारतात आहे."
"जगात सर्वाधिक मालमत्ता जर वक्फ बोर्डाकडे आहे, तर भारतातील मुसलमान गरीब का आहेत? मुसलमानांच्या कल्याणासाठी काम का झाले नाही?", असा सवाल रिजिजू यांनी उपस्थित केला.