ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - कुख्यात दहशतवादी संघटना 'अल कायदा'च्या भारतीय उपखंडातील शाखेने एक नवा व्हिडीओ जारी केला असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेत खबदारीच योग्य ती पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे.
' जागतिक बँक व आतंरराष्ट्रीय नाणेनिधीची धोरणे, ड्रोन हल्ले, शार्ली हेब्दोतील लिखाण, संयुक्त राष्ट्संघ आणि नरेंद्र मोदी यांची वक्तव्ये या सर्वांद्वारे मुस्लिमांविरुद्ध युद्ध सुरू करण्यात आले आहे ', असे या व्हिडीओत म्हटले आहे.
'फ्रॉम फ्रान्स टू बांग्लादेश: दि डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन' असे नाव असलेला हा व्हिडीओ २ मे रोजी जारी करण्यात आला असून त्यात भारतीय उपखंडातील कारवायांचा प्रमुख असिम उमर याचा आवाज आहे. या व्हिडीओचे विश्लेषण केले जात असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेतर्फे सांगण्यात येत आहे.
तसेच फेब्रुवारीमध्ये अविजित रॉय याच्यासह अन्य चार ब्लॉगर्सच्या झालेल्या हत्यांची जबाबादारीही अल कायदाने घेतली आहे
'अल कायदा'चा प्रमुख अयमान अल जवाहिरी याने गेल्या वर्षी अल कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेची घोषणा केली होती. असिम उमरवर या शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.