ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच मध्य प्रदेशात मंदासौर जिल्हात काल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांना गोळीबार केला. या गोळीबारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली असून, शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार म्हणजे सरकारने शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्धच आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला होता. दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे. हे सरकार आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात युद्ध पुकारत असल्याचे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्याबरोबरच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. अन्नदात्यावर गोळी चालवणे अत्यंत दु:खद आहे. आजचा दिवस मध्य प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.