नवी दिल्ली, दि. 3 - डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं. यावेळी चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नसल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भारत शेजारील राष्ट्रांसोबत संबंध वाढवत आहे. आर्थिक विकासासाठी चीनकडून मदत घेतली आहे. श्रीलंका, नेपाळ या देशांना भारताने अनेकदा मदत केली असे निवेदन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले. दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत. पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य असल्याचे स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले. पुढे बोलताना सुषमा स्वराज यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी आपला वयक्तिक सन्मान मिळवला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताला सन्मान मिळवून दिला. ज्यावेळी श्रीलंकेमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारताने सर्वात आधी त्यांना मदत पुरवली. त्यानंतर नेपाळमध्ये भूकंप झाल्यांनंतरही भारताने मदत पोहचवली होती. यमन येथून आम्ही 4500 भारतीयांना सोडवले तसेच 2000 परदेशी नागरिकांनाही बाहेर काढले. हे आमच्या परराष्ट्र धोरणाचे यश असल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केलं.
चीनशी युद्ध हा काही अंतिम पर्याय नव्हे - सुषमा स्वराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 7:24 PM