पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कारगिलमध्ये जात त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत. आम्हाला युद्ध नको आहे. आमच्यासाठी युद्ध हा शेवटचा पर्याय आहे. मात्र शत्रूला आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.
तुमच्या शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. तुम्ही सैनिक सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. सैनिक "संरक्षण कवच" आहेत, ज्यामुळे आपण सर्व भारतीय निर्भयपणे शांतपणे राहू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.