नवी दिल्ली : देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेससह नेहरु-गांधी घराण्यावर निशाणा साधला.
बोफोर्सपासून हेलीकॉप्टर घोटाळ्यापर्यंतची चौकशी एकाच कुटुंबाकडे जाते. त्यामुळे सर्वकाही समजून जाते. काही लोकांसाठी देश पहिला नाही, तर परिवार आणि परिवाराचे हित आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरु- गांधी घराण्यावर यावेळी हल्लाबोल केला.
2009 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली होती. मात्र 2009 ते 2014 पर्यंत एकही बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यात आले नाही. मात्र, गेल्या चार वर्षात या आमच्या सरकारने सैनिकांसाठी 2 लाख 30 हजार पेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेट्स खरेदी केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी मागणी केली जात होती. मात्र, आपल्या आशीर्वादामुळे 2014 मध्ये सुरू केलेले काम आज पूर्णत्वास गेले. सैनिकांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आणि शौर्यामुळे जागतिक पातळीवर ताकदवान देशांच्या यादीत भारताची गणना होत आहे. देशाच्या सैन्याला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून नियमित प्रयत्न केले जाणार आहेत. सैनिकांसाठी अत्याधुनिक शस्त्र खरेदीसाठी सुरुवात झाली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, अनेक देशांशी संरक्षण क्षेत्रात महत्त्वाचे करार करण्यात आले. 2016 मध्ये 50 देशांच्या नौसेनिकांनी एकत्रितपणे भारताबरोबर संचनल केले. सरकारच्या प्रयत्नांमुळे अनेक शक्तिशाली देश भारताबरोबर चालण्यास तयार आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.