आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेस नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा, डिजिटल प्रसिद्धी, सोशल मीडिया, सर्वेक्षण आणि पक्षाच्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी काँग्रेसच्या वॉररूमकडे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षाने अंदाजे १३० जागांना विशेष प्राधान्य दिले आहे. या जागांवर काँग्रेसने आपली सर्व ताकद लावली आहे.पक्षाला आशा आहे की, लोकसभेच्या ३२६ जागांपैकी १३० जागा अशा आहेत ज्या काँग्रेस सहज जिंकू शकतो. सुरुवातीपासूनच काँग्रेसने या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
दोन टीममध्ये विभागणी
वॉररूम वेळोवेळी सर्वेक्षण करते आणि काँग्रेस नेतृत्व आणि उमेदवारांना याची माहिती दिली जाते. एक टीम आहे जी संपूर्ण सोशल मीडियाचे काम हाताळते. दुसरी टीम वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची माहिती गोळा करते.
नेत्यांचा सभांसाठी समन्वय
याशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी किंवा सचिन पायलट यांच्या सभेची मागणी कोणताही उमेदवार करीत असेल तर वॉररूम ही माहिती नेतृत्वाला देते आणि त्यात समन्वयाचे काम करते. याशिवाय सोशल मीडिया टीम काँग्रेसच्या प्रसिद्धीसाठी बनवलेले व्हिडीओ मोठ्या नेत्यांना पाठवते जेणेकरून ते व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अपलोड करू शकतील. दुसरी टीम काँग्रेस नेत्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित करण्याचे काम करते.