लखनौ - कोविड १९ महामारीमुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. गरिबांना अन्न नाही, तर गावापासून, कुटुंबापासून मैलो न मैल दूर अडकलेल्या मजूर व कामगारांना आता वेदना असह्य होत आहेत. कोरोनाच्या भीतीने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कुटुंबीयांनाही कायम कुटुंबातील सदस्यांची चिंता लागल्याचे पाहायला मिळालंय. तर, आपल्या आप्तजनांच्या सुख-दुखातही सहभागी न होण्याचं दु:ख प्रत्येकाच्या मनात आहे. लखनौमधील एका पित्याची अशीच करुणकहानी अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत आहे. राजधानी लखनौ येथील एक रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या बापाला कोरोना संक्रमणाच्या भीतीने आपल्या मृत लेकासोबत भेवटची गळाभेटही घेता आली नाही.
लोकबंधु रुग्णालयात तैनात असलेल्या २७ वर्षीय कोरोना योद्धा मनिष कुमार यांच्याशी संबंधित ही घटना आहे. लोकबंधु रुग्णालयास लेव्हल २ कोरोना रुग्णालय बनविण्यात आले आहे. शनिवारी रात्री मनिष हे वार्डमध्ये आपलं कर्तव्य बजावत होते. त्याचवेळेस, त्यांना घरातून फोन आला. त्यांच्या तीन वर्षीय हर्षित या मुलाला श्वास घेताना त्रास आणि पोटदुखी होत आहे. मात्र, जबाबदारीचं काम असल्याने मी लगेत ड्युटीवरुन घरी जाऊ शकत नव्हतो, असे मनिषने म्हटले.
मनिषच्या कुटुंबीयांनी हर्षितला किंग जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, मनिष रुग्णालयात बैचेन झाला होता. आपल्या चिमुकल्यासाठी त्याचा जीव कासावीस होत होता. अखेर, रात्री दोन वाजत हर्षितने शेवटचा श्वास घेतल्याची बातमी मनिषला समजली. त्यानंतर, मनिषच्या सहकारी वॉर्ड बॉयने त्यास घरी जाऊन मुलाचे शेवटचे दर्शन घेण्याचे सांगितले. त्यानंतर, मनिषने केजीएमयु रुग्णालय गाठले. त्यावेळी, त्याच्या मुलास कुटुबींयांनी रुग्णालयाबाहेर आणले होते. मृत शरीराला रुग्णवाहिकेतून घरी नेताना, मनिषनेही आपल्या मोटारसायकलीवरुन घर गाठले. मनिषला हा प्रसंग अत्यंत वेदनादायी होता. माझ्या चिमुकल्या मुलास मी जवळ घेऊ शकत नाही, त्याची शेवटची गळाभेटही घेऊ शकत नाही, असे सांगताना मनिषच्या डोळ्यात दु:खाच तो अश्रूंनी भरलेला क्षण तरळत होता.
आपल्या मुलाच्या अंत्यसस्कारावेळीही मनिष दूरनच सर्वकाही पाहत होता. कारण, कोविड १९ रुग्णालयातून आल्यामुळे कोरोना संक्रमणाची भीती इतरांसाठी होती. त्यामुळे मनिषने मुलाचे अंत्यसंस्कारही दूरनच पाहिले. त्यामध्ये सहभागी होण्याचं त्याच्या नशिबात नव्हता. आता, हर्षितच्या फक्त आठवणी उरल्याचं मनिषने म्हटले. तर, एक-दोन दिवसांत ड्युटी जॉईन करुन रुग्णांची सेवा करेन, असेही मनिष म्हणाला.