नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशभरात 16 जानेवारीपासून सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र आता या लसीचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्ट) बर्याच लोकांमध्ये दिसून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणानंतर आतापर्यंत एकूण 447 लोकांमध्ये साईड इफेक्ट दिसून आले आहेत. यामधील तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. याच दरम्यान कोरोनाची लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लस घेतल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी लसीमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय वॉर्ड बॉयचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. लस घेतल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लस घेतल्यानंतर काही वेळाने त्यांना त्रास जाणवू लागला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिपाल सिंह असं मृत्यू झालेल्या वॉर्ड बॉयचं नाव आहे. त्यांनी लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लस घेतली होती.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी महिपाल यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. मात्र कुटुंबियांनी कोरोना लस घेतल्यामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्लीत 52 आरोग्य कर्मचार्यांना कोरोनावरील लस दिल्यानंतर त्रास झाला होता. त्यापैकी काहींनी अॅलर्जीची तक्रार केली तर काही जणांची भीती व्यक्त केली.
447 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे साईड इफेक्ट, प्रकृती बिघडल्यामुळे तिघे रुग्णालयात
कोरोना लसीकरणाच्या दुसर्या दिवशी 17,072 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. तर देशात आतापर्यंत एकूण 2,24,301 लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, शनिवारी साईड इफेक्टसीची 51 किरकोळ प्रकरणे नोंदली गेली, त्यातील काहींना किरकोळ समस्या जाणवल्या. मात्र, एका आरोग्य कर्मचाऱ्याची तब्येत थोडी गंभीर होती. त्या कर्मचाऱ्याला एम्समध्ये दाखल केले आहे. या कर्मचाऱ्याचे वय 22 वर्षे असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करतो. एकंदरीत, फक्त एकाला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उर्वरित 51 जणांना थोड्यावेळ तपासणी केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू
कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे. मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे.