नवी दिल्ली : एमआयएमचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी गुरुवारी नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसीच्या विरोधात घेतलेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद देशातील अनेक भागात उमटले आहे. आता तर पठाण यांच्या विरोधात मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्या असून पठाण यांचे शिर कलम करणाऱ्याला या संघटनेकडून बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे.
वारिस पठाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी आंदोलन केले. पठाण यांच्या वक्तव्यावर अनेक मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुजफ्फरपूर येथील अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेने वारिस पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. एक-ए-हिंदुस्थान मोर्चा नावाच्या सामाजिक संघटनेचे संयोजक तमन्ना हाशमी यांनी पठाण यांचे वक्तव्य देशविरोधी असल्याचे म्हटले आहे.
तत्पूर्वी पठाण यांचे पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी पठाण यांच्या फोटोवर चप्पल मारण्यात आले. हैदराबाद आणि महाराष्ट्र या राज्यनंतर बिहार एकमेव असं राज्य आहे जिथे असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे अस्तित्व आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं आहे.