लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा सर्व केंद्रांना गंभीर इशारा दिला आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन आधार नोंदणी नाकारणे ‘भ्रष्ट कृत्य’ म्हणून गृहीत धरले जाईल, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, नोंदणी केंद्रचालकांना परवान्याचे दर १0 दिवसांनी नूतनीकरण करून घ्यावे लागते. सेवा देण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागते, अशा स्थितीत तांत्रिक बिघाडाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तांत्रिक बिघाडाचे कारण देणे म्हणजे केंद्राची पात्रता नाही हे मान्य करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तांत्रिक कारण देऊन कोणाही नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकास परत पाठविता येणार नाही.पांडे म्हणाले की, आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनेक आधार केंद्रांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. काही ना काही कारणे पुढे करून आधार ही केंद्रे नागरिकांना आधार नोंदणी करण्याचे नाकारत आहेत, अशा प्रकारांना भ्रष्ट कृत्य म्हणून गृहीत धरले जाईल.पांडे यांनी म्हटले की, आधार केंद्रचालक आमच्याकडे स्वत:च्या केंद्राची नोंदणी करतात. तसेच दर १0 दिवसांनी नोंदणी नूतनीकृत करतात. ते जेव्हा नोंदणी करतात, तेव्हा त्यांचे यंत्र काम करीत असून नागरिकांची नोंदणी करण्यास ते सक्षम आहेत, असे गृहीत धरले जाते. असे असताना केंद्रचालक लोकांना नोंदणी न करता परत कसे काय पाठवू शकतात?२५ हजार केंद्रेआधारची नोंदणी करण्यासाठी देशभरात २५ हजार केंद्रे कार्यरत आहेत. सध्या ही आधार केंद्रे चालकांच्या मालकीच्या इमारतीत चालविली जातात. ही केंद्रे येत्या काही आठवड्यांत सरकारी आणि पालिकांच्या इमारतींत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे आधार नोंदणी सरकारी कार्यालयांमध्येच केली जाणार आहे. तसे सरकारतर्फे जाहीरही करण्यात आले आहे.
नोंदणी नाकारणाऱ्या आधार केंद्रांना इशारा
By admin | Published: July 05, 2017 12:47 AM