कोरोना व्हायरसच्या दहशतीमध्ये रस्त्यावर चक्कर येऊन किंवा अपघातात जखमी झालेल्यांना कोणी हातही लावण्यास धजावत नव्हते, अशा काळात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अॅम्बुलन्स चालकाचा कोरोनानेच घात केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणाऱ्या आरिफ खान यांचे निधन झाले आहे.
अॅम्बुलन्स चालक आरिफ यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून 200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. तसेच 100 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पोहोचविले होते. कोरोनाने या कोरोना योद्ध्याचा बळी घेतला आहे. आरिफ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर हिंदूराव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
आरिफ यांच्या निधनावर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. आरिफ हे गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगत सिंह सेवा दलामध्ये सक्रीय होते, असे सांगितले जात आहे. तसेच ते मोफत रुग्णवाहिका सेवा देत होते. 21 मार्चपासून ते कोरोना लढ्यामध्ये रुग्णांना हॉस्पिटलला नेणे, आयसोलेशन सेंटरला पोहोचविणे आदी सेवा देत होते. शहीद भगत सिंह सेवा दलाचे संस्थापक जितेंद्र सिंह शंटी यांनी आरिफ यांच्या निधनावर दुख: व्य़क्त केले. मुस्लिम असूनही आरिफ यांनी 100 हून अधिक हिंदू रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले.
जेव्हा आरिफ यांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्य संस्कारासाठी त्याचे कुटुंबीय जवळ नव्हते. त्याच्या कुटुंबाने काही मिनिटांसाठी त्यांचा मृतदेह दूरूनच पाहिला. मी आरिफवर अंत्यसंस्कार केले, असे शंटी यांनी सांगितले. 3 ऑक्टोबरला आरिफ यांची तब्येत खालावली होती. तेव्हा देखील ते एका कोरोना संक्रमिताला घेऊन हॉस्पिटलला जात होते. कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. शुक्रवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या कोरोना वॉरिअरच्या कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये मदत द्यावी अशी मागणी शंटी यांनी केली आहे.