मुंबई: आज(रविवार) समुद्रातील भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील होणार आहे. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आधुनिक गरजा लक्षात घेऊन ही युद्धनौका युद्धासाठी तयार करण्यात आली आहे.
INS विशाखापट्टणम 75 टक्के स्वदेशी
INS विशाखापट्टणम मुंबईतील माजगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. या युद्धनौकेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे 75 टक्के भाग पूर्णपणे स्वदेशी आहे. येत्या काही वर्षांत या वर्गाच्या आणखी तीन युद्धनौका 35,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जातील.
सर्वात लांब विनाशकारी युद्धनौका
INS विशाखापट्टणम 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे, तर वजन 7,400 टन आहे. ही युद्धनौका अतिशय आधुनिक आहे. ही भारतातील सर्वात लांब विनाशकारी युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकाऱ्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात.
INS विशाखापट्टणम शत्रूंचा काळ
अनेक वर्षे विविध चाचण्या पार केल्यानंतर शत्रूचा विनाशक आयएनएस विशाखापट्टणम आता नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आयएनएस विशाखापट्टणमवर तैनात करण्यात आले आहे. त्यावर तैनात केलेले क्षेपणास्त्र 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते.
पाणबुड्यांना उडवण्यास सक्षम
INS विशाखापट्टणम अणु, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासह समुद्रात एक किलोमीटर खोलीवर असलेल्या पाणबुड्यांनाही लक्ष करू शखते. विशेष म्हणजे हिंदी महासागर क्षेत्रातील बदलती परिस्थिती पाहता आयएनएस विशाखापट्टणमच्या आगमनाने नौदलाला बळकटी मिळणार आहे.