चेन्नई : रेल्वेच्या डब्यातून ५.७५ कोटी रुपयांच्या खराब झालेल्या आणि नष्ट करण्यासाठी पाठवण्यात येत असलेल्या नोटांच्या चोरीबद्दल अगदी सुरवातीला जे सांगितले जात होते ते तेवढे खरे नाही. सालेम एक्स्प्रेस सोमवारी रात्री वेगाने चेन्नईला जात असताना डब्याच्या छताला मोठे भोक पाडण्यात आले, असे सुरवातीला सांगण्यात येत होते. या धाडसी चोरीत चार चौरस फुटांचे भोक डब्याच्या छताला गॅस कटरने करण्यात आले, असे मानण्यात येत होते. प्रत्यक्षात ते छोटी छिन्नी किंवा त्यासारख्या हत्याराने केले गेले, असे न्यायवैद्यक तपासणीत सूचित होत आहे. रेल्वेचा हा डबा इरोड येथे रविवारी रात्री दहापासून कोणत्याही संरक्षणाशिवाय असताना हे भोक पाडण्यात आले. सोमवारी सायंकाळी हा डबा मूळ स्टेशनातून सालेमकडे रवाना झाला. या स्टेशनमध्ये रोख ३४२ कोटी रूपये असलेले २२८ खोके ठेवण्यात आले. रेल्वे रात्री दहा वाजता चेन्नईकडे सालेमहून निघाली. मंगळवारी पहाटे रेल्वे एग्मोर स्थानकातून चेन्नई रेल्वेस्थानकात आल्यानंतर चोरी झाली असा संशय चौकशीच्या प्राथमिक पायरीवर आला. ही चोरी अतिशय नियोजनबद्धरित्या व आतील लोकांच्या सहभागाने झाल्याचा संशय आहे. कोणत्या रेल्वेतून ही रोख रक्कम नेण्यात येणार आहे याची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांकडेही बुधवारी चौकशी करण्यात आली. (वृत्तसंस्था)
‘त्या’ डब्याला छिन्नीने भोक पाडले?
By admin | Published: August 12, 2016 2:59 AM