नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी चार हजार वाहनचालकांचे चलन फाडले आहे. वाहतुकीचे नियम तोडण्यावरील कारवाईमुळे हेल्मेट, सीट बेल्ट आदींच्या बाबतीत दिल्लीकर सजग असलेले आढळले. मात्र, दिल्ली पोलिसांकडून घेण्यात आलेल्या काही दंडाच्या रकमा डोळ्याच्या पापण्या उंचावणाऱ्या आहेत. रेवाडी येथील एका ट्रक मालकाने चक्क 1.16 लाख रुपयांचे चलन फाडले होते. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरलाही दीड लाखांच्या जवळपास रुपये दंड भरावा लागला आहे.
नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईचा अंदाज आला नाही. पण, नेमके रविवारीच अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे उपद्रवी चालकांना चांगलाच दणका बसला आहे. गेल्या 10 दिवसांत शासनाच्या तिजोरीत मोठी रक्कमही दंडाच्या स्वरुपात जमा झाली आहे.
राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरने चक्क 1,41,700 रुपयांचे चलन फाडले आहे. 5 सप्टेंबर रोजी ट्रकची वाहतूक करताना वाहतूक पोलिसांना हा ट्रक ओव्हरलोडिंग असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे, पोलिसांनी नवीन मोटार वाहन कायद्यानुसार या ट्रक चालकाडून दंडाची रक्कम वसुल केली. त्यानुसार, ट्रक चालकाने 9 सप्टेंबर रोजी रोहिनी कोर्ट येथे तब्बल 1 लाख 41 हजार 700 रुपये दंड भरला आहे. सोशल मीडियावर या ट्रक चालकाच्या दंडाची रक्कम असलेली पावत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.