नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं असून आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. नीट परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने एक सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने आपण फक्त आनंदी असल्याचा आव आणत होतो असं म्हटलं आहे. तसेच आपल्या पालकांची माफी मागितली आहे. तामिळनाडूमधील निलगिरीस येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपलं बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात नीट परीक्षा दिली होती. वैद्यकीय पात्रता चाचणीत आपण नापास झाल्याचं समजल्यानंतर ती प्रचंड तणावात गेली होती. मुलगी खूप तणावात असल्याने कुटुंबाने तिला तिरुपूर येथील नातेवाईकांकडे पाठवलं होतं. दिवाळीदरम्यान ती पुन्हा आपल्या घऱी आली होती. पण त्यानंतर देखील ती घरामध्ये शांतच असायची. जास्त कोणाशी बोलायची नाही. तिने नीट परीक्षा नापास झाल्याचं खूप मनावर घेतलं होतं.
"नीट परीक्षेत नापास झाल्याच्या तणावातून मी बाहेर येऊ शकले नाही"
18 डिसेंबरला शनिवारी मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिने सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं. घरच्यांनी तिला तातडीने यानंतर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना 23 डिसेंबरला तिचं निधन झालं. सुसाईड नोटमध्ये तिने "नीट परीक्षेत नापास झाल्याच्या तणावातून मी बाहेर येऊ शकले नाही. मी नेहमी आनंदी असल्याचा आव आता आणू शकत नाही" असं म्हटलं आहे.
विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का
या घटनेने विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशीच एक घटना समोर आली होती. सात नोव्हेंबरला एका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने नीट परीक्षेत दोनदा नापास झाल्यानंतर आत्महत्या केली होती. त्याच्या एक महिना आधी 20 वर्षीय तरुणानेही याच कारणामुळे आयुष्य संपवलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.