नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राजीव गांधींची हत्या दहशतवाद्यांची केलेली कारवाई होती की तीदेखील अपघात होती? असा प्रश्न मला दिग्विजय सिंह यांना विचारावासा वाटतो,' असं सिंह म्हणाले. राजीव गांधींबद्दल पूर्णपणे आदर बाळगून मी हा प्रश्न विचारत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुलवामा हल्ल्याला अपघात म्हटल्यानं आणि एअर स्ट्राइकबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं भाजपानं दिग्विजय सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सरकारकडे एअर स्टाइकचे पुरावे मागितले. यानंतर आता दिग्विजय यांनीदेखील त्यांचीच री ओढली. 'पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे,' असं दिग्विजय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हवाई दलानं 26 फेब्रुवारीला दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइक केला. यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, याची आकडेवारी हवाई दल आणि सरकारनं दिलेली नाही. मात्र भाजपा नेत्यांनी मृत दहशतवाद्यांचे वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. यावरुनही दिग्विजय सिंह यांनी मोदींनी लक्ष्य केलं. 'पंतप्रधान मोदीजी, तुमच्या सरकारमधले काही मंत्री म्हणतात 300 दहशतवादी मारले. भाजपा अध्यक्ष 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सांगतात. तर योगी आदित्यनाथ 400 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा करतात. मात्र तुम्ही याबद्दल मौन बाळगलं आहे,' असा टोला दिग्विजय यांनी लगावला. मृत दहशतवाद्यांच्या आकड्यावरुन मोदींवर निशाणा साधणाऱ्या विधानावर व्ही. के. सिंह यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली. 'बालाकोटवरील एअर स्ट्राइकमध्ये 250 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची आकडेवारी केवळ एकाच ठिकाणी आहे. ती इतरत्र कुठेही नाही. हवाई दलानं त्यांचं लक्ष्य अतिशय काळजीपूर्वक निवडलं होतं. ते लक्ष्य नागरी वस्तीपासून दूर होतं. त्यामुळे या हल्ल्लाची झळ नागरिकांना बसली नाही,' असं सिंग यांनी सांगितलं.