नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय असलेल्या शीला दीक्षित यांनी निधन होण्यापूर्वी काही काळ आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथील हत्याकांडातील पीडितांना भेटण्यास गेलेल्या प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेली अडवणूक न थांबल्यास कांग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. दरम्यान, या आवाहनानंतर काही काळानेच शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने त्यांनी दिलेला हा संदेश शेवटचा संदेश ठरला. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या किरण वालिया यांनी सांगितले की, ''शीला दीक्षित यांनी आपल्या शेवटच्या संदेशामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्या स्वत: आंदोलनासाठी उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीमधील कार्यकारी अध्यक्ष हारुन युसूफ हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार होते.'' शीला दीक्षित यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले होते. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. शनिवारी सकाळी त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. काँग्रेसमधील सामर्थ्यशाली नेत्या समजल्या जाणाऱ्या शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबमधील कपूरथलामध्ये झाला. दिल्लीतील कॉन्वेंट ऑफ जीसस एँड मेरी स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून त्यांना एमएची पदवी घेतली. १९८४ ते १९८९ या कालावधीत त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या कन्नौजचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढे त्या दिल्लीचा चेहरा झाल्या. दिल्लीतील अनेक विकासकामं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली.
शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 8:11 AM