श्योपुर - मध्य प्रदेशच्या श्योपुर इथं चित्ता ज्वाला आणि त्याच्या ४ शावकांना पाणी पाजणाऱ्या वाहन चालकाला नोकरीवरून काढले आहे. या वाहन चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या व्हायरल व्हिडिओत वाहन चालक चित्त्याच्या अगदी जवळ जात त्यांना पाणी देताना दिसत आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी वाहन चालकाला नोकरीवरून हटवले.
४ एप्रिल २०२५ च्या सकाळची ही घटना आहे. जेव्हा चित्ता ज्वाला आणि त्याचे ४ शावक आगरा रेंजमधील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळील मानवी वस्तीजवळील शेतात फिरत होते. कुनो प्रशासनाच्या नियमांनुसार, या परिस्थितीत देखभाल करणाऱ्या पथकाने चित्त्यांना पुन्हा जंगलात पाठवण्याचे प्रयत्न करायला हवेत जेणेकरून मनुष्य आणि चित्ता यांच्यातील संघर्ष टाळता येईल. ज्वाला चित्ता आणि त्याच्या शावकांसाठी आगराहून येथून अतिरिक्त फिल्ड स्टाफ बोलवण्यात आला होता. कारण चित्ते उन्हाने व्याकुल होते आणि मानवी वस्तीच्या दिशेने पुढे जात होते. त्यावेळी त्यांना जंगलात आणण्यासाठी पाणी पाजण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी वन विभागाने भाड्याने घेतलेल्या वाहनाचा चालक सत्यनारायण गुर्जर याने ज्वाला आणि त्याच्या शावकांना पाणी पाजले. मात्र ते करताना तो चित्त्याच्या खूप जवळ गेला होता जे नियमांचे उल्लंघन होते. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला तो नंतर व्हायरल झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियात पसरल्यानंतर वन विभाग खडबडून जागे झाले. डीएफओने या प्रकाराची गंभीर दखल घेत वाहन चालकाला तात्काळ कामावरून हटवण्यात आले.
या व्हिडिओची आम्ही दखल घेतली असून त्याचा तपास सुरू आहे. आम्ही कोणत्याही कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला निलंबित किंवा काढून टाकलेले नाही. हा कंत्राटी वाहन चालक होता, ज्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला हटवले आहे असं कुनो नॅशनल पार्कचे डिएफओ म्हणाले. चित्त्यापासून योग्य अंतर ठेवणे, त्यांना सांभाळणे यासाठी प्रशिक्षित आणि अधिकृत कर्मचाऱ्यांना परवानगी आहे. या वाहन चालकाने ना केवळ चित्त्यांना जवळ जाऊन पाणी पाजले तर त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियातही व्हायरल केला हे नियमात बसत नाही असं प्रशासनाने म्हटलं.