जुन्या संसद भवनात वास्तुदोष होता म्हणून महिला आरक्षण विधेयक ९ वर्षांनी आणलं का? काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 03:40 PM2023-09-21T15:40:39+5:302023-09-21T15:41:08+5:30
Women's Reservation Bill: केंद्र सरकार हे विधेयक आणण्यासाठी संसदेच्या नव्या इमारतीची वाट पाहत होती का? जुन्या संसदेत वास्तुदोष होता का? असा सवाल वेणुगोपाल यांनी विचारला.
संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणत केंद्र सरकारने मोठा मास्टरस्ट्रोक मारला आहे. लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद असलेले हे विधेयक काल लोकसभेत प्रचंड बहुमताने पारित झाले आहे. आता आज या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होणार आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे.
काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, तुम्ही गेल्या ९ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर आहात. मग तुम्हाला महिला आरक्षण विधेयक लागू करण्यास एवढा उशीर का झालाय. २०१४ ते २०२३ अशी ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार हे विधेयक आणण्यासाठी संसदेच्या नव्या इमारतीची वाट पाहत होती का? जुन्या संसदेत वास्तुदोष होता का? असा सवाल वेणुगोपाल यांनी विचारला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत नवीन संसद भवनातील कामकाजाचा श्रीगणेशा केला होता. १९ सप्टेंबर २०२३ रोजी नव्या संसद भवनात मांडण्यात आलेले हे पहिले विधेयक आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्याची सरकारची तयारी आहे.'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं या विधेयकाचं नामकरण केलं आहे, आता लोकसभेत पारित झालेलं हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यास त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे.