लखनऊ - शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी अयोध्यामध्ये गांधी परिवाराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या मुस्लिम परिवारातून होत्या. त्यामुळे काँग्रेसचे लोक प्रभू रामचंद्राचे अस्तित्व मानण्यास तयार नाहीत असं वादग्रस्त विधान वसीम रिजवी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एवढचं नव्हे तर वसीम रिजवी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. प्रियंका गांधी या सुंदर आहेत. त्यांना राजकारणात येण्याची गरज नव्हती. जर त्या आधी आल्या असत्या तर आम्ही त्यांना आमचा चित्रपट राम जन्मभूमी यामध्ये जफर खानच्या सुनेची भूमिका दिली असती असं विधान वसीम रिजवी यांनी केलं आहे. त्याचसोबत या पुढे मी कधी अयोध्या येईल तेव्हा भव्य मंदिरातील रामाचं दर्शन करेन असा दावा रिजवी यांनी केला.
निर्मोही आखाडाद्वारे मध्यस्थी करण्यासाठी ठिकाण बदलण्याची याचिका सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यावर बोलताना मध्यस्थी करण्यासाठी अयोध्येपेक्षा सुरक्षित ठिकाण असू शकत नाही असं वसीम रिजवी म्हणाले. रामजन्मभूमी हा सिनेमा प्रदर्शित होण्याविरोधात समाजवादीच्या काही लोकांना न्यायालयात अपील केले. त्यामुळे डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा सिनेमा 29 मार्च रोजी रिलीज करु असं रिजवी यांनी सांगितले.