लखनऊ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी सतत अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने बोलत असल्याचे दिसून येत आहे. वसीम रिझवी यांनी मंगळवारी असे विधान केले आहे की, त्यांच्या स्वप्नात प्रभू रामचंद्र आले आणि अयोध्येतील राम मंदिराच्या परिस्थितीवर रडू लागले.
भारतातील कट्टरपंथी मुस्लिम पाकिस्तानच्या झेंड्याला इस्लामचा झेंडा असल्याचे सांगतात आणि त्या देशावर प्रेम करणे आपले इमान समजतात. एवढेच नाही तर, या लोकांनी प्रभू रामचंद्र जन्मभूमीवर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. मात्र, अयोध्या प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान आहे, असे वसीम रिझवी म्हणाले.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाकिस्तानकडून पैसे घेऊन काँग्रेसला हाताशी धरुन प्रभू रामचंद्र जन्मभूमीचा मुद्दा कोर्टात उपस्थित केल्याचा आरोप सुद्धा वसीम रिझवी यांनी केला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर झाले पाहिजे आणि त्यासंदर्भातला निर्णय आता लवकरात लवकर झाला पाहिजे. राम भक्तच नाहीत तर प्रभू रामचंद्रही या संपूर्ण प्रकरणामुळे हताश झाले आहेत, असे मला वाटते असेही वसीम रिझवी यांनी यावेळी स्पष्ट केले.