नवी दिल्ली : या वर्षी देशातील शेतकरी आणि एकूणच सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. लागोपाठ दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे शेतीवर आलेले दुष्काळाचे संकट पाहता हा अंदाज शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. शेतीवर अवलंबून असलेले आर्थिक विकासाचे गाडे रुळावर आणण्यासाठीही तो लाभदायक ठरणार आहे. या वर्षीचा मान्सून शुभसंकेत देणारा असून, संपूर्ण देशासाठी हे वर्ष चांगल्या पावसाचे राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.मुख्य म्हणजे गेली तीन वर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या आणि पाण्याच्या टंचाईमुळे हैराण झालेल्या मराठवाड्यात या वर्षी चांगला पाऊस बरसणार आहे, असे आयएमडीचे महासंचालक लक्ष्मणसिंग राठोड यांनी या हंगामाचा हवामानविषयक अंदाज जाहीर करताना स्पष्ट केले. ईशान्य भारत आणि आग्नेय भारतात विशेषत: तामिळनाडू आणि लगतच्या रायलसीमा भागात सामान्यापेक्षा किंचित कमी पाऊस पडेल. मान्सूनच्या मध्यात दरमहा पावसाचे प्रमाण जाहीर करता येईल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)असा मोजतात जास्त श्रेणीचा पाऊसदुष्काळग्रस्त मराठवाडा आणि बुंदेलखंडमध्ये या वर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे राठोड यांनी खासकरून नमूद केले आहे. एलपीएच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी पावसाला अपुरा पाऊस संबोधले जाते. एलपीएच्या तुलनेत ९० ते ९६ टक्के पाऊस हा सामान्यापेक्षा कमी मानला जातो. एलपीएच्या तुलनेत ९६ ते १०४ टक्के पाऊस झाल्यास तो सामान्य मानला जातो. एलपीएच्या तुलनेत १०४ ते ११० टक्के पाऊस म्हणजे सामान्यापेक्षा जास्त ठरत असून, त्यापेक्षा अधिक पाऊस ‘जास्त’ (एक्सेस) या श्रेणीत मोडतो. अल-निनोचा कमकुवत प्रभावअल-निनोचा प्रभाव कमकुवत होत असल्यामुळे या वर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे आयएमडीचे वैज्ञानिक डी.एस. पै यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी अल-निनोमुळे केवळ मान्सूनलाच फटका बसला नसून हिवाळाही उष्ण राहिला. मान्सूनच्या पहिल्या अर्धसत्रात अल-निनोची स्थिती सौम्याकडून कमकुवत स्थितीकडे जात आहे.
यंदा देशभरात धो धो पाऊस !
By admin | Published: April 13, 2016 3:53 AM