बंगळुरू : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंगळुरूत कठोर नियमावली जारी करण्यात आली असतानाच त्याचे उल्लंघन करणाऱ्या २२ जणांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कारणांसाठी केला जाऊ नये, याकरिता बंगळुरू पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागातर्फे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात नियमावली जाहीर करण्यात आली. गाडी धुणे, बगिचातील झाडांना पाणी देणे, कारंजासाठी वा इतर कोणत्याही कारणांसाठी पाण्याचा वापर केल्यास दंड आकारण्यात येईल, असाही दंडक आखून देण्यात आला.
गेल्या तीन दिवसांत शहरातील २२ जणांनी या नियमावलीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने दंड ठोठावण्यात आला. या दंडाची रक्कम एक लाख रुपये भरली. पाण्याचा अपव्यय केल्याच्या सर्वाधिक घटना शहराच्या दक्षिणेकडील भागात नोंदविल्या गेल्या.
गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान सातत्याने वाढत असून पाणीपुरवठा करणारे जलस्रोत झपाट्याने आटू लागले आहेत. एप्रिल आणि मे हे दोन महिने आणखी तीव्र उन्हाळ्याचे असतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)