श्रीनगर-
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb) CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. सीआरपीएफच्या कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब फेकून महिला पळून गेली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या हातात बॉम्ब असल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरखा घातलेल्या महिलेची ओळख पटली असून तिला लवकरच अटक करण्यात येईल.
दरम्यान, पोलिसांनी नुकत्याच झालेल्या एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले, त्यापैकी एक पत्रकार होता पण नंतर तो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता. सोपोरमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली असून सदर ठिकाण बाजार परिसरातील आहे. येथे रस्त्याच्या एका बाजूला सीआरपीएफचं बंकर तयार करण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. पिशवीत काहीतरी घोळत असताना ती इकडे तिकडे पाहते आणि बॅगमधून एक संशयास्पद वस्तू बाहेर काढते. महिला ती वस्तू सीआरपीएफच्या बंकरच्या दिशेनं फेकते आणि या ठिकाणी आग लागल्याचं पाहायला मिळतं. महिलेनं पेट्रोल बॉम्ब फेकल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यानंतर तेथे गोंधळाचं वातावरण दिसून येत आहे. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागतात. काही लोक बादल्यांमध्ये पाणी भरून आग विझवताना दिसत आहेत. ही घटना घडत असताना रस्त्यावरून ये-जा करणारे अनेकजण दिसतात. अनेक मोटारसायकल आणि कारही रस्त्यावरून येताना दिसतात.
हातात स्फोट होणार होताइंडिया टुडेच्या वृत्तानुसार महिलेनं सीआरपीएफ बंकरवर फेकलेली वस्तू पेट्रोल बॉम्ब होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुरुवातीला बुरखा घातलेली महिला होती की पुरुष याबाबत शंका होती, पण बुधवारी सकाळी काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयला घटनेची माहिती दिली. "काल सोपोरमधील सीआरपीएफ बंकरवर बॉम्ब फेकणाऱ्या महिलेची ओळख पटली असून लवकरच तिला अटक करण्यात येईल", असं आयजी विजय कुमार यांनी सांगितलं आहे. सीसीटीव्हीत महिलेच्या हातातच बॉम्ब फुटता फुटता राहिला. तिनं बॉम्ब फेकून तेथून पळ काढला.