इंदूर: गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला साथ देणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इंदूर येथील जाहीर सभेत हार्दिक यांनी राहुल यांच्या पेहरावाची आणि देहबोलीवरून टिप्पणी केली. हार्दिक यांनी म्हटले की, राहुल गांधी अनेकदा भाषणादरम्यान आपल्या सदऱ्याच्या बाह्या वर करत असतात. याचा त्रास होत असले तर राहुल यांनी योग्य कपडे घातले पाहिजेत. राहुल गांधींनी जीन्स घालावी. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा राजस्थानमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी जोधपुरी सूट घातला होता. यानंतर लोकांनी त्यांना स्वीकारले होते. काळ बदलत असतो. त्यामुळे राहुल गांधींनीही खादीचे कपडे घालणे व सदऱ्याच्या बाह्या वर करण्याची सवय सोडली तर देश त्यांनाही स्वीकारेल, असे हार्दिक यांनी म्हटले. यानंतर काँग्रेस नेत्यांकडून हार्दिक यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले. हार्दिक पटेल हल्ली फॅशन डिझायनरचेही काम करतात हे आम्हाला माहिती नव्हते. आम्हाला वाटले होते की, ते शेतकऱ्यांचे नेते आहेत, युवा नेतृत्त्व आहे, तसेच त्यांच्यात पुढे जाण्याची ओढ आहे. एखाद्याचे कपडे किंवा सदरा कसा असावा, हे सांगणे डिझायनरचेच काम असते. त्यामुळे हार्दिक यांनी राहुल गांधींना नसते सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असे काँग्रेसने सांगितले.
VIDEO: हार्दिक पटेलांनी केली राहुल गांधींची नक्कल; काँग्रेसचे चोख प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:53 AM