नवी दिल्ली-भारत दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानाला भेट देताना पाणीपुरी आणि लस्सी यासह विविध भारतीय पदार्थ चाखले. एएनआय या वृत्तसंस्थेने दोन्ही नेते पाणीपुरी आणि लस्सीचा आस्वाद घेत असतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
लस्सी बनवण्याची प्रक्रिया देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी जपानच्या पंतप्रधानांना समजावून सांगितली. यानंतर दोघांनी ‘आम-पन्ना’चीही चव चाखली. आम-पन्ना हे उन्हाळ्यातील थंड पेय असून देशभरात लोकप्रिय आहे. पुढे जपानचे पंतप्रधान चक्क पाणीपुरी खाताना देखील दिसले. पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. याची प्रचिती जपानच्या पंतप्रधानांना देखील आली. पाणीपुरीनं अगदी जपानच्या पंतप्रधानांचंही मन जिंकल्याचं पाहायला मिळालं.
किशिदा पंतप्रधान मोदींसोबत भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारतात दाखल होताच किशिदा यांनी मोदींसमवेत राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जपानी पंतप्रधानांनी नंतर दिल्लीच्या धौला कुआन येथील बुद्ध स्मारक उद्यानाला भेट दिली जिथे तिबेटी लोकांच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून बुद्धाची सुवर्ण मूर्ती आहे.
दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये एक बैठकही घेतली जिथे किशिदा यांनी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या G7 नेत्यांच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं. त्यांनी यावर्षी यजमान राष्ट्र म्हणून भारताच्या G20 उद्दिष्टांबद्दल देखील बोलले आणि PM मोदी म्हणाले की सप्टेंबरमध्ये G20 शिखर परिषदेसाठी किशिदाचे पुन्हा स्वागत करता येणार आहे याचा मला आनंद आहे.