'सेल्फी' का जमाना है बॉस असं म्हटलं जातं. पण एका सेल्फीसाठी जीव धोक्यात घालणारीही माणसं आपण अनेकदा पाहिली आहेत. सेल्फीचं वेड काय करायला लावेल काही सांगता येत नाही. आंध्र प्रदेशात वंदे भारत ट्रेनमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. एक प्रवासी 'वंदे भारत' एक्स्प्रेस ट्रेन आतून कशी दिसते हे पाहण्यासाठी आणि सेल्फी टिपण्यासाठी ट्रेनमध्ये चढला. पण ट्रेन निघायची वेळ झाली आणि स्वयंचलित दरवाजे बंद झाले. मग काय सुपर एक्स्प्रेस ट्रेन असल्यानं पठ्ठ्याला पुढे थेट २०० किमीचा प्रवास करावा लागला.
स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी व्यक्तीनं गोंधळही घातला. टीसी येण्याआधी बाहेर पडता येतं का याचा प्रयत्न तो करत होता. पण टीसीनं हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि पठ्ठ्याला चांगलंच सुनावलं. आपण केवळ फोटो काढण्यासाठी ट्रेनमध्ये चढलो होतो पण खाली उतरण्याआधीच दरवाजे बंद झाले असं तो रेल्वे टीसीला सांगताना व्हिडिओत दिसतो. तसंच आपल्याला खाली उतरू द्यावं अशीही टीसीली विनंती त्यानं केली. सुपरफास्ट रेल्वे अशी मध्येच विनातिकीट प्रवाशासाठी थांबवू का? तू वेडा आहेस का?, अशा शब्दात टीसीनं सेल्फीवेड्या प्रवाशाला सुनावलं.
"स्वयंचलित दरवाजे एकदा लॉक झाले की ते उघडता येत नाहीत. सेल्फी काढण्यासाठी ट्रेनमध्ये कोण येतं का? वेडा झाला आहेस का?", असं टीसीनं संबंधित व्यक्तीला सुनावलं. सोशल मीडियाचा याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे मिम्सही तयार होऊ लागलेत. दाक्षिणात्य सिनेमांमधील डायलॉग्जसह मिम व्हिडिओ शेअर केले जात आहेत. तसंच अनेकांनी सेल्फीवेड्या तरुणाची खिल्लीही उडवली आहे.