मुंबई - पद्मावती चित्रपटावरु सुरु असलेल्या वादावर बोलताना अभिनेता शाहीद कपूरने आधी चित्रपट बघा, मग बोला असं आवाहन केलं आहे. शाहीद कपूरने चित्रपटात पद्मावतीच्या पतीची म्हणजेच राजा रतन सिंगची भूमिका साकारली आहे. यावेळी शाहीद कपूरने अभिनेत्री दीपिका पादुकोणला शिरच्छेद करण्याची धमकी देण्यावरुन संतापही व्यक्त केला. एका स्त्रीबद्दल अशी भाषा वापरली जाते, हे अशोभनीय आहे असं शाहीदने म्हटलं आहे. ‘फिल्मफेअर स्टाईल अॅण्ड ग्लॅमर अवॉर्ड्स’च्या वेळी शाहिदने आपलं मत व्यक्त केलं.
‘माझ्या मते पद्मावती एक चांगला चित्रपट आहे. त्यामुळे चांगलं कथानक असलेल्या इतर चित्रपटांना जसा प्रतिसाद मिळतो, तशीच प्रतिक्रिया हा सिनेमा जेव्हा कधी प्रदर्शित होईल, तेव्हा मिळेल अशी अपेक्षा आहे’, असं शाहीदने सांगितलं आहे.
संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. राजस्थानच्या करणी सेनेनं सिनेमाला तीव्र विरोध दर्शवत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. वाढता विरोध पाहता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, सिनेमाला आतापर्यंत सेन्सॉर बोर्डकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखदेखील जाहीर केलेली नाही. यामुळे सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांची निराशा झाली आहे.
एकूणच पद्मावती सिनेमामागील वाद थांबता थांबत नाहीयत. मात्र, या सर्व वादाचा काही जण फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. पद्मावतीच्या नावावर बोगस व्हिडीओला सिनेमा असल्याचं सांगत यू-ट्युबवर अपलोड करण्यात येत आहे. हे व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. या बनावट व्हिडीओमुळे पद्मावती सिनेमा लीक झाल्याचे इंटरनेट युजर्संना वाटत आहे.
सुप्रीम कोर्टाची नाराजीमंत्री व मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तींच्या वक्तव्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचे मन निष्कारण कलुषित होऊ शकते. त्यामुळे या मंडळींनी वाचाळपणा करण्याआधी कायद्याची चौकट आपल्यालाही लागू आहे, याचे भान ठेवायला हवे, अशी नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने पद्मावतीबद्दलची याचिका फेटाळली.
चित्रपटात राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन, शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.