ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगाच मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन 'दूरदर्शन' चॅनेलने एक पाऊल पुढे टाकत नवी सुविधा आणली असून त्याद्वारे आता तुम्हाला मोबाईलवरही 'दूरदर्शन' चॅनेल पाहता येणार आहे आणि तेही विनाइंटरनेट म्हणजे 'फ्री'मध्ये...
देशांतील १६ शहरांमध्ये दूरदर्शनतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ग्राहकांना यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. २५ फेब्रुवारीपासून दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, चेन्नी, गुवाहाटी, पाटणा, रांची, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदौर, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये दूरदर्शनची डिजीटल टेलिव्हिजन सेवा सुरू झाली असून आता ग्राहकांना मोबाईलवरही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.
कसे पहाल मोबाईलवर दूरदर्शन चॅनेल?
दूरदर्शनच्या या फ्री टीव्ही सुविधेचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला डीव्हीबी-टी २ हे डोंगल घ्यावे लागेल. त्यानंतर डोंगलच्याच माध्यमातून एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही स्मार्ट फोन वा टॅबलेटमध्ये दूरदर्शन मोफत पाहू शकता. तसेच प्रवासादरम्यान जर तुम्हाला ही सुविधा असेल तर त्याकरिता त्या वाहनांवर लावण्यात आलेल्या वायफाय डोंगलद्वारे ही सुविधा उपलब्ध होईल.
कोणकोणती चॅनेल्स उपलब्ध ?
या सुविधेअंतर्गत तुम्ही डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी स्पोर्ट्स, डीडी प्रादेशिक, व डीडी किसान ही चॅनेल्स पाहू शकाल.