नवी दिल्ली : दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेसाठी तैनात असलेली महिला पोलीस कर्मचारी राष्ट्रगीत सुरू असताना पायाचा तोल गेल्याने घसरून खाली पडली. हे समजल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यासपीठावरून खाली येत त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दिल्लीत मंगळवारी नॅशनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना एक महिला पोलीस कर्मचारी पायाच्या तोल गेल्याने घसरून खाली पडली आणि किरकोळ जखमी झाली.
या घटनेनंतर राष्ट्रगीत संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यासपीठावरून खाली येत त्या पोलीस कर्मचारी महिलेजवळ पोहोचले आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी तसेच, अनुराग ठाकूर यांनी त्या पोलीस महिलेला पिण्यासाठी पाणी दिले. दरम्यान, यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कौतुक करण्यात येत आहे.