नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिसत वाढत चालली आहे. आज चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज अमेठीत प्रचारसभा पार पडली. यावेळी राहुल गांधीचे प्रचारसभेत भाषण सुरु होते. त्यावेळी अजानचा आवाज ऐकून राहुल गांधी यांनी मध्येच भाषण थांबविले.
सत्ताधारी मोदी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी देशभरात रॅली आणि प्रचारसभांचा तडाखा लावला आहे. शनिवारी अमेठीमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, भाषणादरम्यान अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे राहुल गांधी यांनी मध्येच आपले भाषण थांबविले आणि अजान पूर्ण होईपर्यंत स्तब्ध राहिले.
उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याशी आहे. अमेठीहून राहुल गांधी तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे.