डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या फोनवर एका निनावी व्यक्तीने हरिद्वारस्थित प्रसिद्ध ‘हर की पौडी घाट’ उडवून देण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून, ‘हर की पौडी’ सभोवतालच्या परिसराची सुरक्षा कडेकोट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सेंथिल अवूदै कृष्ण राज यांनी सांगितले की, एका निनावी व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर ९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता फोन करून धमकी दिली. हा फोन मुख्यमंत्र्यांचे शिष्टाचार अधिकारी आनंद सिंह रावत यांनी घेतला.शिष्टाचार अधिकाऱ्यांनी रविवारी दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू करण्यात आली. ‘हर की पौडी’ घाट सभोवतालच्या परिसराची सुरक्षा कडेकोट करण्यात आली असून, हरिद्वार रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावरील प्रवाशांची चोवीस तास तपासणी केली जात आहे. ‘हर की पौडी’ आणि लगतच्या घाटावरही पोलीस कसून तपासणी करीत आहेत. संशयित हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री फोनवरून लोक शुभेच्छा देत असताना धमकी देणारे दोन फोन आल्यान खळबळ उडाली. धमकीचा फोन आल्याची माहिती कळवताच पोलिसांनी फोन करणाºया व्यक्तीचा शोध घेणे सुरू केले. या व्यक्तीला हरिद्वारमधून अटक केली.
‘हर की पौडी’ उडवून देण्याच्या धमकीने खळबळ, संशयित हालचालींवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:44 AM