जम्मू : काश्मिरातील सांबा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाला दहशतवाद्यांनी बोगदा खणला असल्याचे आढळून आले. या बोगद्याद्वारे खोऱ्यात दहशतवादी पाठवून अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचा पाकिस्तानचा डाव उधळून लावल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाने केला आहे.
सीमेलगत चक फकिरा या चौकीजवळ सीमा सुरक्षा दलांना एक संशयास्पद खड्डा आढळला. अधिक तपास केला असता दोन फूट रुंद आणि १५० मीटर लांब असा हा बोगदा असून त्याचा उगम पाकिस्तानी क्षेत्रात असल्याचे आढळून आले.
- या बोगद्यातात सिमेंटच्या २१ गोण्याही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आढळून आल्या. पाकिस्तानी चौकी चमन खुर्दच्या (फैज) समोर आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५० मीटरवर तर सीमेच्या तारांपासून ५० मीटर अंतरावर हा बोगदा खोदण्यात आला आहे.
- हा बोगदा चक फकिरापासून ३०० मीटर अंतरावर व सीमेवरील भारताच्या अंतिम गावापासून ७०० मीटर दूरवर जाऊन खुला होतो. दीड वर्षात आढळलेला हा पाचवा बोगदा आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानच्या बाजूने हा बोगदा खणण्यात आला होता. अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्याचा दहशतवाद्यांचा कट सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला आहे. एस. पी. सिंधू, महानिरीक्षक, सीमा सुरक्षा दल.