पाटणा: बिहारमधील भ्रष्टाचार वाढला आहे. त्यावरून सरकारी कर्मचारी एकमेकांना मारहाण करत आहेत. जमुई जिल्ह्यात असाच प्रकार घडला. लक्ष्मीपूर येथील रेफरल रुग्णालयात एका नवजात अर्भकाला बीसीजीचा डोस देण्यावरून आशा कार्यकर्ती आणि एएनएम यांच्यात हाणामारी झाली. दोघी रुग्णालयातच एकमेकींना भिडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लक्ष्मीपूरमधल्या रेफरल रुग्णालयात रविवारी एका बाळाचा जन्म झाला. प्रसुत महिलेल्या धेऊन आशा कर्मचारी रिंटू कुमारी एएनएम रंजना कुमारी यांच्याकडे पोहोचल्या. नवजात अर्भकाला बीसीजीचा डोस द्यायचा होता. पण त्यासाठी रंजना कुमारी यांनी ५०० रुपये मागितले. नवजात बाळाच्या कुटुंबीयांनी पैसे नकार देण्यास नकार दिला.
यावरून आशा कर्मचारी रिंटू कुमारी आणि एएनएम रंजना कुमारी यांच्यात वाद झाला. थोड्याच वेळात वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. तिथे उभ्या असलेल्या एका तरुणानं हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
२९ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. त्या दोघी एकमेकींचे केस खेचत आहेत. एक व्यक्ती त्यांचं भांडण सोडवताना दिसत आहे. एक महिला दुसरीला कानशिलात लगावत आहे. याशिवाय तिनं चप्पल काढून मारहाण केली.