तिरुअनंतपूरम : केरळमधील पलक्कड भागातील डोंगरावर दोन दिवस अडकून पडलेल्या २० वर्षीय आर बाबू याला ( R Babu) भारतीय लष्कराने सुखरुप वाचवले. हा तरुण अडकल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु तो जिथे अडकला होता, तिथे पोहोचणे त्यांना जमले नाही. अखेर लष्कराची मदत घेण्यात आली.
दोन दिवस उपाशी पोटी खोल दरीत अडकलेल्या या तरुणाला तेथून बाहेर काढण्यासाठी लष्कारने शर्थीचे प्रयत्न केले. जवान हेलिकॉप्टरच्या साहाय्याने डोंगरावर उतरले आणि त्यानंतर त्या तरुणाला वाचवण्याचा थरार सुरू झाला. सोशल मीडियावर या तरुणाला लष्कराच्या जवानांनी कसे वाचवले याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोरीच्या सहाय्याने या जवानांनी एक साखळी तयार केली आणि एक जवान त्या तरुणाजवळ पोहोचला. त्यानंतर जवानाने सर्वात आधी त्या तरुणाला धीर देत पाणी पिण्यास दिले अन्...
पलक्कड भागातील मलमपुझा डोंगरावर तो सोमवारपासून अडकला होता. तरुण खोल दरीत अडकल्याची माहिती मिळताच, बचाव टीम त्याला वाचवण्यासाठी गेले. पण, बाबू जिथे अडकला होता, तिथे जाणे अतिशय कठीण होते. गेल्या दोन दिवसांपासून बाबून डोंगरावरील एका छोट्याशा खड्ड्यात आपला जीव मुठीत धरुन बसला होता. त्यानंतर Southern Command INDIAN ARMY चे जवान तिथे दाखल झाले आणि त्या तरुणाला वाचवले.