नवी दिल्ली - लेखक संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावरुन वादंग उठले आहे. काँग्रेस नेत्यांनी या ट्रेलरनंतर चित्रपटाला आक्षेप घेतला आहे. तर, अनेकांकडून टीकाही करण्यात येत आहे. त्यातच, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी याने आता 'चौकीदार ही चोर है' असा चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यावरुन भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. आता, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, 'चौकीदार ही चोर है' या नावाने हा चित्रपट आपण बनवू इच्छित असल्याचे जिग्नेश यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला लाभलेले दुर्दैवी पंतप्रधान आहेत. या चित्रपटातून भाजपाच्या ग्लोबलायजेशन विकास मॉडेलची वास्तव मला मांडायचे असल्याचे मेवानी यांनी म्हटले.
जर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असा एखादा चित्रपट निघालाच, तर तो रेकॉर्डब्रेक कमाई करेल. सुपरस्टार शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्याही कमाईचे रेकॉर्ड हा चित्रपट मोडीत काढेल, असेही मेवानी यांनी म्हटले. तसेच मोदी सरकार आणि भाजपावर विविध मुद्द्यांवरुन टीकाही केली. दरम्यान, द अॅक्सिटेंडल प्राईम मिनिस्टर चित्रपटाचा ट्रेलर भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही शेअर केला होता. त्यानंतर, हा वाद अधिकच चिघळला आहे.