प्रयागराज - राहुल गांधी यांनी नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी मला उत्तर प्रदेशात पाठवलं आहे. चौकीदार हे गरिब शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं योग्य मोल मिळत नाही. गेल्या 5 वर्षात देशात बेरोजगारी वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. मायावती यांनी केलेल्या टीकेवरही प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही,आमची लढाई भारतीय जनता पार्टीविरोधात आहे असं प्रियंका गांधींनी मायावतींना सांगितले.
यावेळी प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशाचं संविधान संकटात आहे. अनेक वर्ष मी घरात होते. मात्र आता देश संकटात आहे त्यामुळे मला घराबाहेर पडावं लागलं अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर केली. प्रयागराज ते वाराणसी सुरु केलेल्या गंगा यात्रेदरम्यान त्या लोकांशी संवाद साधत होत्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही समोर येत नाही मात्र स्वत:च्या उद्योगपती मित्रांसाठी हजारो-करोडो रुपये दिले जातात. दिवसेंदिवस बेरोजगारी देशात वाढत आहे असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरूवात झाली आहे. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे. हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं. प्रियंका गांधी यांच्या या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला 'गंगा जमुना तहजीब यात्रा' असं नाव देण्यात आले आहे. ही यात्रा २० मार्चपर्यंत चालणार असून, आवश्यक त्या ठिकाणी त्या बस व ट्रेनमधूनही प्रवास करणार आहेत.