ऑनलाइन लोकमत
नीलगिरी, दि. 24 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या नीलगिरी येथील कोडानाडू टी इस्टेटच्या रखवालदाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ओहम बहाद्दूर थापा (50) हा वॉचमन मृतावस्थेत आढळला. दुसरा वॉचमन क्रिष्णा बहाद्दूर थापाला (37) प्रवेशव्दाराजवळ रशीने बांधले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांच्या पाच टीम्स बनवण्यात आल्या आहेत.
हे दोन्ही वॉचमन नेपाळचे आहेत. ओहम बहाद्दूर थापाच्या शरीराच्या बाहय भागावर कुठल्याही जखमा नव्हत्या. शवविच्छेदनानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल असे नीलगिरीचे पोलीस अधीक्षक मुरली रामभा यांनी सांगितले. जखमी क्रिष्णा थापाला कोटागिरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव या इस्टेच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नीलगिरीच्या उतारावर असलेले कोडानाडू टी इस्टेट 1100 एकरमध्ये पसरलेली आहे. या इस्टेटमध्ये 12 ठिकाणांहून प्रवेश करता येतो. इथे 30 वॉचमन वेगवेगळया शिफ्टमध्ये काम करतात. एकूण 600 जण इथे नोकरी करतात. बहुतांश कामगारांना राहण्यासाठी इथे घरे दिली आहेत.