नवी दिल्ली : गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्यावहिल्या जलचर विमानसेवेचा (सीप्लेन) शुभारंभ केल्यानंतर सरकारची महाराष्ट्रासह देशभरातील १४ ठिकाणी जलपृष्ठीय विमानतळे स्थापन करण्याची योजना आहे.या जलपृष्ठीय विमानतळांमुळे लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह विविध मार्गांवर जलचर विमानसेवा सुरू करता येईल. देशभरात उडाण योजनेअंतर्गत आणखी १४ जलस्तरीय विमानतळे विकसित केली जाणार आहेत. यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने भारतीय आंतर जलमार्ग प्राधिकरणाला जल सर्वेक्षण करण्याचे आणि नंतर प्रवासी वाहतुकीसाठी जेट्टी (धक्का) उभारण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे, असे जहाज बांधणी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुजरातेत सीप्लेन सेवेच्या शुभारंभानंतर जहाज बांधणीमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, गुवाहाटी, अंदमान-निकोबार आणि उत्तराखंडमध्ये विविध जलमार्गे नियमितपणे ही सेवा सुरू करण्याचा बेत आहे. यात टेहरी धरण (उत्तराखंड), उमरांगसो जलाशय (आसाम), खिंडसी आणि इराई धरण (महाराष्ट्र), हटबे बेट गुजरातमधील धरोई आणि शत्रुंजय या ठिकाणांचा समावेश आहे.
सीप्लेन सेवेसाठी आणखी १४ ठिकाणी वॉटर एअरोड्रोम - जहाज बांधणीमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 1:09 AM