कानपूर : संपूर्ण कानपूर शहरात पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मुरली मनोहर जोशी तिथे फिरकत नसल्याच्या निषेधार्थ कानपूर काँग्रेसतर्फे त्यांच्याविरोधात शहरभर पोस्टर्स व होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत.जोशी हे कानपूरचे खासदार असले तरी ते कायम दिल्लीतच असतात आणि सहा महिन्यांतून एकदा कधीतरी तिथे येतात, अशी स्थानिक लोकांची तक्रार आहे. या वर्षी संपूर्ण कानपूरमध्ये पाण्याची अतिशय टंचाई आहे. शहराच्या काही भागांनाच तेही अधूनमधून पाणी मिळते आणि बहुतांशी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेसच्या होर्डिंग्ज मोहिमेची शहरभर चर्चा सुरू असली तरी भाजपाचे कार्यकर्ते व स्थानिक नेते मात्र संतापले आहेत. मात्र खा. जोशी खरोखरच अधूनमधून कानपुरात येत असल्याने आमच्याकडे काँग्रेसच्या मोहिमेचे उत्तर नाही, असे एका भाजपा नेत्याने सांगितले. >मुरली मनोहर जोशी यांना उद्देशून आपण यांना पाहिले का, अशा मजकुराची होर्डिंग्ज आणि पोस्टर्स काँग्रेसने शहरात लावली आहेत. यांना जो शोधून आणेल, त्या व्यक्तीला घडाभर पाणी मोफत दिले जाईल, असेही त्यात लिहिले आहे. >काही होर्डिंग्जवर आपण यांना ओळखता का, आपण यांना कुठे पाहिले आहे का, पाण्याप्रमाणेच हेही कधीकधीच कानपुरात येतात, असा मजकूर आहे.
पाणी व मुरली मनोहर जोशी कधी कधीच येतात!
By admin | Published: May 18, 2016 4:31 AM