नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे. त्यासाठी केजरीवाल घरोघरी जावून नागरिकांना समस्या विचारत आहे. त्यातच केजरीवाल दक्षिण दिल्लीत गेले असताना त्यांच्यासोबत एक गंभीर घटना घडली आहे.
महिलांना मोफत मेट्रो प्रवासाच्या मुद्दावर केजरीवाल यांना विरोध करण्यात आला. एवढच काय तर एका महिलेने केजरीवाल यांचे शर्ट देखील धरले. वीज आणि पाण्याच्या मुद्दावर आपल्या सरकारची कामगिरी सांगताना केजरीवाल यांना येथील लोकांनी घेरले. यावेळी लोकांनी पाणी नव्हे तर वीज आणि घाणीच्या मुद्यावर केजरीवाल यांना धारेवर धरले. त्यानंतर केजरीवाल यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्वरीत कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिले.
मागील एक महिन्यापासून दोन तास वीजपुरवठा खंडीत करण्यात येतो, अशी तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर कार्यावाही करत केजरीवाल यांनी तातडीने ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान पाच वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेत आले तेव्हा पाण्याची समस्या होती. तीच समस्या अद्याप कायम असल्याचे लोकांनी केजरीवाल यांना सांगितले. त्यावर पुढील तीन दिवसांत पाण्याची समस्या दूर करण्यात येईल असं आश्वासन केजरीवाल यांनी येथील नागरिकांना दिले.