लाेकमत न्यूज नेटवर्कबेंगळुरू : कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला हस्तांतरणाच्या निषेधार्थ कर्नाटक रक्षा वेदिके आणि विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या 'कर्नाटक बंद'च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विशेषतः दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कर्नाटक रक्षा वेदिके, कन्नड चालवली (वताल पक्ष) आणि विविध शेतकरी संघटनांची सर्वोच्च संघटना असलेल्या 'कन्नड ओक्कुटा' यासह कन्नड संघटनांनी राज्यभर बंदची हाक दिली आहे. दरम्यान, राज्य परिवहन विभागाने सरकारी परिवहन महामंडळांना सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
संपूर्ण कर्नाटकात बंद पुकारण्यात आला असून ते महामार्ग, टोल नाके, रेल्वे सेवा आणि विमानतळ बंद करण्याचा प्रयत्न करतील. शहरातील टाऊन हॉल ते फ्रीडम पार्कपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात सर्व स्तरातील लोक सहभागी होतील, असा दावा बंदच्या आयोजकांनी केला. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. हॉटेल, ऑटोरिक्षा, कार चालकांच्या संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा असल्याचे कर्नाटक प्रदेश प्रायव्हेट स्कूल असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. कावेरीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या विरोधात कावेरी खोऱ्यातील मांड्या येथे गुरुवारी काही कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने तामिळनाडूबाबत मवाळ भूमिका स्वीकारली असून या प्रकरणाकडे योग्य लक्ष दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)