नवी दिल्ली: दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असली तरी ती धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहे. आज सकाळी ७ वाजता यमुना नदीची पाणीपातळी २०५.७१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. तत्पूर्वी, काल रात्री १२ वाजता जुन्या रेल्वे पुलावर (ओआरबी) यमुना नदीच्या पाण्याची पातळी २०५.७५ मीटर नोंदवण्यात आली होती.
दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी सोमवारी सांगितले की, यमुनेच्या पाण्याच्या पातळीत किंचित चढ-उतार दिसत आहेत, त्यामुळे लोकांनी मदत छावण्यांमध्येच राहावे. त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे रविवारी हरियाणाच्या काही भागात यमुनेच्या पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाखाली गेल्यानंतरच लोकांनी आपापल्या घरी परतावे, असं आवाहन आतिशी यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात यमुनेच्या पाण्याची पातळी २०७.४९ मीटर होती. याने यापूर्वीचा २०८ मीटरचा विक्रम मोडला. यानंतर दिल्लीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर आला. आयटीओ रोडवर अजूनही पाणी तुंबले आहे. १२ जुलै रोजी याने २०८ मीटरचा टप्पा ओलांडला होता. यमुनेच्या पाण्याची पातळी अद्यापही धोक्यात आहे. हिमाचल, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस न पडल्यास दिल्लीतील यमुनेची जलपातळी लवकरच कमी होईल.
हिमाचलमध्ये पुन्हा ढगफुटी
खुद्द कुल्लूच्या खरहालमध्ये मध्यरात्री ढगफुटी झाली. नाल्याला पूर आल्याने नेउली शाळा आणि अनेक घरे वाहून गेली. उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी आता धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे.
धरण फोडण्यासाठी गोळीबार
पंजाबमधील मानसा येथील झंडा गावात घग्गर नदीवरील धरणाला तडे गेले. त्यामुळे हरियाणात पुराचा धोका वाढला आहे. यापूर्वीच २४ गावे पुरात अडकली आहेत. त्याचवेळी पंजाब सीमेजवळील हरियाणातील फतेहाबादमध्ये घग्गरवर बांधलेले धरण फोडण्यासाठी मुसाखेडाच्या ग्रामस्थांनी गोळीबार केला.